जळगाव मिरर | १८ जानेवारी २०२४
आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय व पक्षाचे सचिव सूरज चव्हाण यांना खिचडी घोटाळ्यात दि.१७ रोजी ईडीकडून अटक करण्यात आली आहे. सूरज चव्हाण यांच्यावरील कारवाईचा आदित्य ठाकरे यांनी निषेध केला आहे. लोकशाही, सत्य, संविधान ह्यासाठी आमचा लढा आहे आणि आम्ही जिंकणारच, असे ट्वीट करत आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.
“लोकशाही संपवून आपल्या राज्यात मिंध्यांची टोळी हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करीत आहे. जेवढी घाबरट आणि पोकळ राजवट, तेवढी जास्त त्यांची मस्ती आणि एजन्सीचा वापर, अशीच ही मिंधे राजवट, मिंधेंसारखे झुकले नाहीत, म्हणूनच सूरजला सतावले जात आहे,” असे गंभीर आरोपही आदित्य ठाकरेंनी यावेळी केले. तसेच “भाजप आणि मिंधेंमध्ये सामील झाले नाहीत, कारण ते देशभक्त आहेत, नाहीतर, प्रत्येक भ्रष्ट राजकारण्यांसारखेच मिंधे राजवटीत मंत्री झाले असते, स्वाभिमान, हिंमत, ताकद आणि स्वच्छ मन. सच्चा दिलाचा सूरज आहे. आम्ही सगळेच सत्यासाठी लढत राहू, लोकशाही, सत्य, संविधान ह्यासाठी आमचा लढा आहे आणि आम्ही जिंकणारच, महाराष्ट्र पाहत आहे, जग पाहत आहे,” असेही आदित्य ठाकरे म्हणाले.