जळगाव मिरर | २७ डिसेंबर २०२४
व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय शिक्षणासोबतच मूल्य शिक्षण महत्त्वाचे आहे. सुसंस्कारित शिक्षण म्हणजेच मूल्यशिक्षण असल्याने प्रत्येकाने आपल्या कृतीतून भारतीय संस्कृतीचा वसा आणि वारसा जोपासणे गरजेचे आहे. आपल्या भारतीय संस्कृतीतून मिळणारे संस्कार मूल्यांवर आधारित आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीचा पाया मजबूत करण्यासाठी आपल्यात संस्कारांची किंबहुना मूल्यांची रूजवणूक होणे गरजेचे आहे. तेव्हाच आपले जीवन आनंदी आणि समृद्ध होईल, असे प्रतिपादन बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी केले.
यावल तालुक्यातील भालोद येथील कला व विज्ञान महाविद्यालयात भारतीय संस्कृती व संस्कार केंद्रातर्फे आयोजित मूल्यशिक्षण आणि संस्कृती कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे होते. यावेळी न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक डी.व्ही. चौधरी, भारतीय संस्कृती व संस्कार केंद्राचे प्रमुख प्रा.डॉ. सुनील नेवे, मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. जतीनकुमार मेढे, प्रा.डॉ. दिनेश पाटील, प्रा.डॉ. राकेश चौधरी, प्रा.डॉ. वाघुळदे मॅडम, प्रा.डॉ. खोब्रागडे, न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक दीपक आमोदकर, गायत्री जावळे, मनीषा नेहते आदी उपस्थित होते. डी.व्ही. चौधरी व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक व वक्त्यांचा परिचय भारतीय संस्कृती व संस्कार केंद्राचे प्रमुख प्रा.डॉ. सुनील नेवे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा.डॉ. वाघुळदे मॅडम यांनी तर आभार प्रा.डॉ. खोब्रागडे यांनी मानले.
मूल्यशिक्षण या विषयावर बोलताना डॉ. जगदीश पाटील म्हणाले की, शालेय शिक्षणासोबतच मूल्यशिक्षणही महत्त्वपूर्ण आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ऋषीमुनींची प्राचीन थोर परंपरा आहे. पूर्वी गुरूकुलच्या माध्यमातून शिक्षण दिले जाई. त्यावेळी शिक्षणासोबतच संस्कारांची देखील जोपासना होत असे. परंतु मधल्या काळात ब्रिटिशांच्या शिक्षण पद्धतीमुळे भारतीय संस्कृती बाजूला पडत गेली. स्वातंत्र्यानंतर यात मूल्यसंवर्धन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच आता नव्यानेच आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञानाचा वारसा म्हणून शिक्षण पद्धतीला नैतिक मूल्यांची जोपासना देण्यात आली आहे. त्यामुळे शालेय शिक्षणात दिलेल्या दहा गाभाभूत मूल्यांसोबतच वैयक्तिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, अध्यात्मिक मूल्ये रूजणे महत्त्वाचे आहे. शालेय वयात ही मूल्ये रूजल्यास आपले भविष्यकालीन जीवन आनंदी व समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही, असे देखील डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले. यावेळी न्यू इंग्लिश स्कूलमधील इयत्ता नववी व दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते.