अमळनेर : विक्की उत्तम जाधव
पडळसरे धरणाला केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळाली असती तर केंद्राच्या बळीराजा सिंचन योजनेतून निधी मिळाला असता, असे म्हणणाऱ्या खासदारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अमळनेर ‘भारत जोडो अभियान’तर्फे करण्यात आली आहे.
केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळविण्यासाठी कोण आमदार, कोण खासदार कमी पडले. आमदार खासदार कोणत्या पक्षाचे होते, याचा उल्लेख खासदारांनी अमळनेर येथील पत्रकार परिषदेत केला नाही. २०१४ पासून राज्यात व केंद्रात भाजप सरकार आहे. उद्धव ठाकरे यांनी लक्ष दिले नाही, हा खासदार उन्मेष पाटील यांचा आरोप चुकीचा आहे. तत्कालीन जलसंपदा मंत्री व तत्कालीन मुख्यमंत्र्यांना खासदारांनी किती वेळा पत्रव्यवहार केला, हे त्यांनी जाहीर केले नाही. २०१४ ते २०१९ या काळात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन असतानाही पाडळसे धरण पूर्ण झाले नाही, याचा उल्लेख खासदार का करीत नाहीत. असा सवाल करण्यात आला आहे.
अमळनेर तालुक्यात सिंचन फक्त पंधरा टक्के आहे, हे सांगणाऱ्या खासदार उन्मेष पाटील यांनी पडळसरे धरणाच्या प्रश्नाला फारसे महत्त्व दिले नाही. शेतकऱ्यांच्या वेदनाशी नाते जोडले नाही व धरणाला राजकीय आश्रय मिळवून दिला नाही. शासकीय अधिकाऱ्याकडून सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी अडचणी निर्माण होतात. २२ स्मरणपत्रे पाठविली हे सांगणाऱ्या उन्मेष पाटलांचे अधिकारी ऐकत नाही, हीच त्यांनी जाहीर कबुली दिली असल्याचे भारत जोडा अभियानने म्हटले आहे. पाण्याच्या महत्त्वाच्या प्रश्नाबाबत शेतकरी व उद्योगविरोधी भूमिका घेणाऱ्या उन्मेष पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी भारत जोडो अभियानतर्फे ३१ ऑक्टोबर रोजी प्रांत कार्यालयासमोर ११ वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन भारत जोडो अभियानचे प्रमुख प्रा. अशोक पवार यांनी केले आहे.