
जळगाव मिरर | १५ जून २०२६

मेहरूण परिसरातील श्रीराम तरुण मित्र मंडळ संचलित श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चा ‘शाळा प्रवेश उत्सव’ सोमवारी (दि. १५) अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे औक्षण, गुलाबपुष्प देऊन स्वागत, मोफत पाठ्यपुस्तक व शैक्षणिक साहित्य वाटप तसेच ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’ या अभिनव उपक्रमामुळे शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय ठरला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती माता आणि प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून उत्सवाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव तथा माजी नगरसेवक श्री. अशोकभाऊ लाडवंजारी होते, तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्री. पन्नालालजी वंजारी उपस्थित होते.
यावेळी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. दिवाकर जोशी, प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती ईश्वरी वंजारी, ज्येष्ठ शिक्षिका सौ. सरस्वती पाटील आणि सौ. प्रतिभा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात श्री. अशोकभाऊ लाडवंजारी यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देत शिस्त, स्वच्छता, नियमित अभ्यास आणि दैनंदिन शाळा उपस्थितीचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
विद्यार्थ्यांमध्ये भविष्यातील ध्येय निश्चितीची प्रेरणा निर्माण करण्यासाठी ‘भविष्यातील तारे – श्रीराम विद्यालयाचे विद्यार्थी सारे’ या संकल्पनेअंतर्गत ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी डॉक्टर, अभियंता, शिक्षक, पोलीस अधिकारी, सैनिक आदी विविध क्षेत्रांतील आपली भविष्यातील स्वप्ने आणि उद्दिष्टे व्यक्त केली. श्री. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी नवीन शैक्षणिक वर्षाचा संकल्प करत प्रतिज्ञाही घेतली.
यावेळी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते नवीन पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साहित्य तसेच दैनिक सकाळच्या शैक्षणिक पुरवणीचे वाटप करण्यात आले. नवीन पुस्तके आणि साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव झळकत होते. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी खाऊ वाटपाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह अधिकच वाढला.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री. अतुल चाटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. दिनेश पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन श्री. किरण सुरेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
उत्साह, आनंद आणि सकारात्मक ऊर्जा यांचा संगम असलेल्या या प्रवेशोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाबद्दल नवचैतन्य आणि शिक्षणाविषयीची प्रेरणा निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.




















