
जळगाव मिरर | २१ जून २०२५
जळगाव जिल्हा दौऱ्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दि.२० रोजी आले होते. या दौऱ्यात अनेक घटना घडल्यामुळे हा दौरा मोठा चर्चेत आला आहे. तर धरणगाव येथे क्रांतिकारी ख्वाज्याजी नाईक यांचा पुतळा अनावरण कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मान्यवरांसह मंत्री महोदय उपस्थित होते. याच कार्यक्रमात व्हीआयपी व्यवस्थेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आ.खडसे व अजित पवार गटाचे नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर दिसून आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथराव खडसे व नुकताच अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची उपस्थिती होती. एकनाथराव खडसे यांनी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो आहे अशी प्रतिक्रिया देत अनेकांच्या भुवया उंचावल्या तर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. पूर्वा श्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून त्यांनी नुकताच अजित पवार गटात प्रवेश केलेला आहे. देवकर यांची या कार्यक्रमाला उपस्थिती लाभल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. निमंत्रण वाटप कोणी केले हा मुद्दा देखील मोठ्या प्रमाणात चर्चेला जात आहे.
देवकर आप्पांची अडचण वाढणार ?
गेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी महाविकास आघाडीतर्फे जळगाव ग्रामीण मतदार संघात निवडणुकीच्या मैदानात उतरले होते मात्र त्यांचा मोठा पराभव झाल्यानंतर त्यांनी काही महिन्यात लागलीच महायुतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून सेफ झोन मध्ये देवकर आप्पा आले असले तरी आता महायुतीमधील शिंदेंच्या शिवसेनेशी देखील माजी मंत्री देवकर आप्पांना जुळवून घ्यावे लागणार आहे तर दि.२१ रोजी झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची उपस्थिती दिसल्याने मतदार संघातील ठराविक समुहातील मतदारांच्या भुवया उंचावल्या होत्या. जसे गेल्या विधानसभा निवडणुकीत ज्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आम्ही मतदान केले ते आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात दिसल्याने त्यांनी देखील आश्वर्य व्यक्त केले आहे. त्यामुळे आगामी काळात माजी मंत्री गुलाबराव देवकर आप्पा अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.




















