जळगाव मिरर | ४ जुलै २०२५
चाळीसगाव शहरातील बस स्थानकासमोरील विनायक प्लाझा हॉटेल व रेसिडेन्सी या लॉजमध्ये सुरू असल्याची चाळीसगाव शहर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार केलेल्या सापळा कारवाईत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत दोन महिला वेश्या व्यवसाय करताना सापडल्या असून, व्यवस्थापकासह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी पो.कॉ. निलेश हिरालाल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अमित मनेळ यांनी चाळीसगावचा पदभार स्वीकारताच पहिलीच कारवाई करीत धडाका सुरु केला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, आज दिनांक ३ जुलै २०२५ रोजी दुपारी पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांना उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्याकडून माहिती मिळाली होती की, भडगाव रोडवरील विनायक प्लाझा लॉजमध्ये महिलांच्या मदतीने अनैतिक व्यवसाय सुरू आहे. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहकांमार्फत सापळा रचला. बनावट गग्राहकांना अनुक्रमे १५००/- रुपयांच्या नोटांसह पाठविण्यात आले. त्यांनी आत जाऊन कळवले की, महिलांसह सौदा निश्चित करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ धाड टाकत रुम नं. १०६ आणि रुम नं. २०८ मध्ये महिला बनावट ग्राहकांसोबत आढळून आल्या. पोलिसांनी महिलांकडून २३,०१०/- किंमतीचा मुद्देमाल आणि मोबाइल, कंडोमचे बॉक्स जप्त केले.
लॉजच्या काउंटरवर बसलेला व्यवस्थापक प्रसाद राजेंद्र गवळी (वय २१) याच्याकडून बनावट ग्राहकांनी दिलेल्या पाचशेच्या नोटा आणि मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले. लॉजचे मालक मनोज छगन गवळी (रा. फुले कॉलनी, चाळीसगाव) हे असल्याचे समोर आले आहे. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम : ₹२३,०१०/-, मोबाईल फोन : ३ (Oppo, Vivo व OnePlus), कंडोमचे बॉक्स असा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यानंतर तीनही आरोपी व पीडित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. पीडित महिलेला धुळे महिला सुधार गृहात रवाना करण्यात आले आहे. तर याप्रकरणी आरोपींवर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ अंतर्गत कलम ३, ४, ५, ७ व ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. या पथकात पो.उ.नि. संदीप घुले, पो.हे.कॉ. योगेश बेलदार, विनोद पाटील, भूपेश वंजारी, पो.ना. नितीन आगोणे, पो.कॉ. आशुतोष सोनवणे, राकेश महाजन, पवन पाटील, महिला पोलीस मालती बच्छाव, मयुरी शेळके यांचा समावेश होता.
