जळगाव मिरर | १७ डिसेंबर २०२३
देशभरातील अनेक ठिकाणी छोटे मोठे स्फोट होण्याच्या घटना सातत्याने घडत असतांना आज नागपूरमधील बाजारगावातील सोलार कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये ६ महिलांचा समावेश आहे. सरकारकडून मृत्यांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. बचावकार्यासाठी राज्य आपत्ती विभाग पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, नागपुरातील सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात 6 महिलांसह 9 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे. संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार करणारी ही कंपनी आहे.
नागपूर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याशी सातत्याने संपर्कात असून स्वतः IG, SP, जिल्हाधिकारी घटनास्थळी आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना 5 लाख रुपये मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे, अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सोलार कंपनी भारतातील अनेक संरक्षण क्षेत्राशी संबंधीत कंपन्यांना दारुगोळा पुरवठा करते. संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके याच कंपनीत तयार केली जातात. हेच काम करत असताना झालेल्या स्फोटात कामगारांचा मृत्यू झाला आहे.