जळगाव मिरर | २५ सप्टेंबर २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीची चाहूल राज्यात लागली असून त्यासाठी जोरदार फिल्डिंग देखील लावली जात असतांना नुकतेच बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांना दिलेल्या जबाबात काही खुलासे केले होते. त्यामुळे या प्रकरणात कुणाला तरी वाचविण्यासाठी शिंदेचे एन्काउंटर केले गेले का?, असा सवाल करत एका शिंदेने दुसऱ्या शिंदेचा एन्काउंटर केला. आता त्या शिंदेचा जनता एन्काउंटर करेल, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
नाशिक दौऱ्यावर आलेल्या राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी शिंदेच्या एन्काउंटरवरून महायुती सरकारवर आरोपाच्या फैरी झाडल्या. राऊत म्हणाले की, राज्यात आणि देशात असे अनेक एन्काउंटर आम्ही पाहिले आहेत. मला जितकी अंडरवर्ल्डची माहिती आहे तेवढी गृहमंत्री आणि एन्काउंटर करणाऱ्यांनादेखील माहिती नाही. शाळेचे संस्थाचालक दोषी नसतील तर त्यांच्यावर पोस्कोअंतर्गत का गुन्हा दाखल केला?, असा सवाल करत शंका घ्यावी असेच हे प्रकरण आहे. मुंबई किंवा देशभरातील कुठलंही एन्काउंटर हे कधीही खरे नसते. त्यात काहीतरी रहस्य असते. काहीतरी संपवायचे असते. हा सर्व प्रकार संशयास्पद आहे. या प्रकरणात मोठे मासे वाचवायचे आहेत. हे जे कोणी आहेत भाजपशी संबंधित संस्थाचालक ज्यांनी सीसीटीव्ही फुटेज लगेच गायब केले. संस्थाचालक दोषी नसेल तर सीसीटीव्ही फुटेज का गायब केले? याचे उत्तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी द्यावे, अशी मागणीही राऊत यांनी केली.