जळगाव मिरर | ३० ऑक्टोबर २०२४
ऑप्टिकल फायबर टाकण्याचा कंत्राट देतो, असे सांगून जामनेरच्या दोघांनी पवन चौकातील एकाची जवळपास साडेअकरा लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची घटना अमळनेर शहरात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पवन चौकात विजय धनराज पाटील यांची व्यंकटेश इंटरप्रायझेस नावाची फर्म आहे. दरम्यान, १५ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता त्यांच्या ओळखीचे जामनेर येथील राहुल दत्तात्रय चव्हाण, सागर दत्तात्रय चव्हाण हे दोघे विजय पाटील यांच्या घरी आले. त्या वेळी त्यांनी तुम्हाला ऑप्टिकल फायबर टाकण्याचा कंत्राट देतो, असे सांगून १५ लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर विजय याने टप्प्याटप्याने ११ लाख ५० हजार रुपये दिले. मात्र, दोन्ही चव्हाण बंधूनी ऑप्टिकल फायबर केबलचा ठेका त्यांना दिला नाही. तर विजय पाटील यांनी पैशाची मागणी केली. त्यावेळा या दोघांनी पैशांसाठी तगादा लावू नको, अन्यथा तुला संपवून टाकू, अशी धमकी दिली. या प्रकरणी विजय पाटील यांच्या फिर्यादीवरुन अमळनेर पोलीस ठाण्यात जामनेरच्या त्या चव्हाण बंधू विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक विकास देवरे करत आहेत.