जळगाव मिरर | ९ डिसेंबर २०२३
जळगाव जिल्ह्यातील अनेक गावात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढल्याने नागरिकांना नाहक त्रास होत आहे. नुकतेच अमळनेर शहरातील गुरुकृपा कॉलनीतील एका सहा वर्षाच्या बालिकेवर पाच कुत्र्यांनी हल्ला करून तिचे लचके तोडून जखमी केल्याची घटना दि. ८ रोजी सायंकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यश्री नितीन पवार (वय ६) ही बालिका शेजाऱ्याला बोलवायला गेली असता अचानक बाहेरील पाच कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला चढवला. तिच्या हातापायांना विविध ठिकाणी चावा घेतला. आजूबाजूच्या नागरिकांनी तिला कुत्र्याच्या तावडीतून सोडवले. तिला तातडीने नर्मदा फौंडेशन मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डॉ अनिल शिंदे व डॉ संदीप जोशी यांनी तिच्यावर उपचार केले. कुत्र्यांनी तिच्या अंगावर २० ते २५ ठिकाणी चावा घेतला आहे. तिला ५० टाके पडले आहेत. दरम्यान पालिकेकडून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.