जळगाव मिरर | १६ जानेवारी २०२४
आज देखील भारतात मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, असे मानणारा एक मोठा वर्ग समाजात आहे. मुलगी नको मुलगाच हवा, या अट्टाहासापोटी गर्भलिंगनिदान, स्त्रीभ्रूण हत्येच्या घटनाही समाजात घडत असतात. मात्र मध्यप्रदेशातील बैतुल येथील एका पित्याने मुलगी झाली नाही म्हणून आपल्या नवजात मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैतुलच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बज्जरवाड गावातील ही घटना आहे. अनिल उइके असे या नराधम पित्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारूच्या नशेतील अनिलने ओली बाळंतीण असलेल्या आपल्या पत्नीला रविवारी रात्री बेदम मारहाण केली. अनिलने या दाम्पत्याचा १२ दिवसांचा चिमुकलादेखील आपल्या पत्नीकडून हिसकावून घेतला. पतीचा मार टाळण्यासाठी ही महिला घरातून पळून गेली. काही वेळानंतर ती परतली असता झोपडीत तिचा चिमुकला मृतावस्थेत आढळला.
मृत अर्भकाच्या गळ्याभोवती हातांचे व्रण आढळले असून त्याची गळा आवळून हत्या केल्याचे स्पष्ट होत आहे. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. तिसऱ्या वेळी तरी मुलगी व्हावी, अशी अनिलची इच्छा होती. परंतु मुलगा झाल्याने तो नाराज होता. तिसऱ्या अपत्याच्या जन्मापासूनच तो पत्नी व मुलावर संताप व्यक्त करत होता. रविवारी त्याने रागाच्या भरात आपल्या चिमुकल्याची हत्या केली. पोलिसांनी या निर्दयी बापाला अटक केली असून त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे.