
जळगाव मिरर | १६ जून २०२६

जळगाव जिल्हा पोलीस दलाने आज पहाटेपासून जळगाव शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरोधात मोठी विशेष धडक कारवाई हाती घेतली आहे. पहाटे सुमारे ४ वाजता सुरू झालेल्या या मोहिमेत सराईत गुन्हेगार, टोळ्या (गँग्स) तसेच विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या संशयित व्यक्तींना लक्ष्य करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या या कारवाईसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये स्थानिक पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच RCP (रायट कंट्रोल पथक) यांचा सहभाग असून शहरातील विविध भागांमध्ये एकाचवेळी धाडी टाकण्यात आल्या.
कारवाईदरम्यान अनेक संशयित व सराईत गुन्हेगारांच्या निवासस्थानांची झडती घेण्यात आली. तसेच शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. मालकीबाबत शंका असलेली अथवा आवश्यक कागदपत्रे नसलेली वाहने पुढील चौकशीसाठी संबंधित पोलीस ठाण्यात जमा करण्यात येत आहेत.
यावेळी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनेक व्यक्तींना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. त्यांच्याकडून सविस्तर चौकशी करण्यात येत असून इंट्रोगेशन फॉर्म भरून त्यांची माहिती संकलित केली जात आहे. संबंधित व्यक्तींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबरोबरच आवश्यकतेनुसार नवीन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करणे, गुन्हेगारांवर वचक निर्माण करणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे हा या विशेष मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये मोठी खळबळ उडाली असून शहरभर चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, ही विशेष मोहीम दिवसभर सुरू राहण्याची शक्यता असून आणखी काही संशयितांना ताब्यात घेण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





















