
जळगाव मिरर | ३१ ऑक्टोबर २०२४
राज्यात विधानसभा निवडणुकीचा कहर सुरु असून जळगाव जिल्ह्यात देखील पैशांसह, मद्य तस्करी रोखण्यासाठी निवडणुकीची अनुषंगाने जिल्हा पोलीस दलाकडून शहरात नाकाबंदी केली जात आहे. दरम्यान, बहिणाबाई चौकात सुरु असलेल्या नाकाबंदीत बुधवारी सायंकाळी पोलिसांनी भूषण चंद्रकांत चौधरी (रा. रिंगरोड, जळगाव) यांच्या कारमधून तीन लाख ३० हजार २०० रुपयांची रोकड जप्त केली.
मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीची आचार संहीता सुर असल्याने जिल्हा पोलीस दलाकडून शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी केली जात आहे. जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मिरा देशमुख व त्यांचे पथक बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शहरातील बहिणाबाई उद्यान चौकात नाकाबंदी करीत होते. त्यांच्याकडून वाहनांची तपासणी केली जात असतांना रिंगरोड परिसरातील भूषण चंद्रकांत चौधरी यांच्या ताब्यातील लाल रंगाच्या गाडीतून तीन लाख ३० हजार २०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेली रक्कम व वाहन निवडणुकीचे (एफएसटी) पथक प्रमुख संजय धमे ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे.