जळगाव मिरर | १९ ऑक्टोबर २०२४
जुन्या एमआयडीसीतील सद्गुरु नगरातून चोरी गेलेल्या कारच्या शोधासाठी गेलेल्या पोलिसांनी कार चोरट्याला पकडले खरे, मात्र त्याच्याजवळ जळगाव ऐवजी परभणी येथून चोरलेली कार मिळून आली तर जळगावची कार तामिळनाडूच्या दिशेने गेल्याचे तपासात समोर आले आहे. जी कार चोरट्याजवळ मिळाली, त्याच कारने ते जळगावात आल्याचे निष्पन्न झाले आहे. शेख दाऊद शेख मंजूर (रा. सुंदरवाडी, संभाजीनगर) असे चोरट्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सद्गुरु नगरातून ३ ऑक्टोबर रोजी रात्री दीपक जगदीश खडके यांच्या मालकीची कार (एम.एच.०२ सी डब्लु ०९०६) अंगणातून चोरी झाली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तांत्रिक बाबीचा आधार घेत तपास केला असता कार संभाजीनगरच्या दिशेने रवाना झाल्याचे निष्पन्न झाले. शेख दाऊद शेख मंजूर (रा. सुंदरवाडी, संभाजीनगर) हा राज्यासह देशात कार चोरीत माहीर असून त्याच्याविरुद्ध गुन्हेही दाखल असल्याचे समोर आले पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी उपनिरीक्षक दीपक जगदाळे, हवालदार दत्तात्रय बडगुजर, किशोर पाटील, राहुल रगडे, विशाल कोळी व राहुल घेटे यांचे पथक संभाजीनगरकडे रवाना केले. शेख दाऊद हा एका कारसह मिळून आला. ही कार त्याने जळगावला येण्यासाठी वापरली होती.