
जळगाव मिरर | २ जुन २०२६

जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून शहर पोलिस स्टेशन आणि एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या पथकांनी रविवारी (दि. ३१ मे) दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे दोन डंपर जप्त केले आहेत. या प्रकरणी दोन्ही चालकांविरुद्ध संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली कारवाई शहर पोलिस स्टेशनच्या पथकाने रविवारी पहाटे सुमारे ३ वाजेच्या सुमारास केली. शहरातील चित्रा चौक परिसरातून एक डंपर अवैधरीत्या वाळू वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संबंधित डंपर अडवला. तपासणीअंती डंपरमध्ये अवैध वाळूची वाहतूक सुरू असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तत्काळ डंपर जमा करत चालक चंदू इक्बाल शाह (वय २३, रा. खेडी, ता. जळगाव) याला ताब्यात घेतले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या पथकाने तालुक्यातील विटनेर गावाजवळ केली. विटनेर परिसरातून अवैध वाळूची वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरात पाहणी करत कारवाई केली असता वाळूने भरलेला एक डंपर आढळून आला. पोलिसांनी सदर डंपर जप्त करत चालक हरिश गौतम सपकाळे (वय २८, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. अवैध गौणखनिज वाहतुकीविरोधात अशाच प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत.




















