
जळगाव मिरर | १८ डिसेंबर २०२४
जळगाव शहरात गेल्या काही वर्षापासून दरोडे, चोरीसह अवैध धंदे जोरदार सुरु असून काही प्रमाणात पोलीस प्रशासन यावर कारवाई करताना नेहमीच दिसत असले तरी एक गजब प्रकरण समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पैसे तिप्पट करण्याचे अमिष दाखवीत ग्रामसेवकाकडून १६ लाखांची रोकड असलेली बॅग घेवून त्याची फसवणुक करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा पर्दाफाश झाला. बॅग घेणाऱ्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी आपल्या पोलीसांच्या गणवेशाचा वापर करीत वर्दीत हे कृत्य केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. त्यामुळे काही पैशांचा मोह हा पोलिसांना चांगलाच महागाड पडला आहे. या संपुर्ण घटनेचा मास्टर माईंड हा पोलीस कर्मचारी असून त्यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील ग्रामसेवक विकास पाटील यांना क्रिकेट खेळण्याचा छंद आहे. त्यामुळे जळगावात आयोजीत केलेल्या एका क्रिकेटच्या स्पर्धेवेळी त्यांची सचिन धुमाळ या तरुणासोबत ओळख झाली होती. त्यानंतर ते क्रिकेट खेळतांना एकमेकांच्या संपर्कात आले आणि काही दिवसांपुर्वी ते राजस्थान येथे फिरायला गेले होते. त्यावेळी सचिन धुमाळ याने माझ्याकडे एक जण मुद्दल रक्कमेच्या तिप्पट रक्कम करुन देणारा असल्याचे त्याने विकास पाटील यांना सांगितले. तुमच्याकडे असलेली आणि माझ्याजवळी रक्कम आपण त्याला देवून त्यातून तिप्पट झालेली रक्कम निम्मे वाटून घेणार असल्याचे त्याने सांगितले होते. राजस्थानावरुन घरी परतल्यानंतर तो या विषयी पाटील यांना वारंवार विचारणा करू लागला. तसेच त्यांना भेटण्यासाठी तो पाचोरा येथे देखील गेला होता. त्यामुळे विकास पाटील यांचा त्याच्यावर विश्वास बसला.
त्यानुसार विकास पाटील हे सोमवार दि. १६ डिसेंबर रोजी १६ लाख रुपये घेऊन जळगावात आले. शहरातील जी. एस. ग्राऊंडजवळ ते धुमाळला भेटले. त्यावेळी धुमाळ याने आपल्या बॅगेत २० लाख रुपये असल्याचे सांगत ते पैसे तिप्पट करणाऱ्याला पैसे देण्यासाठी रेल्वे स्थानकावर गेले. त्याठिकाणी एक जण आला व तो दोघांजवळील बॅग घेऊन गेला. त्याच्या मागे हे दोघे जात असताना दोन पोलीस कर्मचारी गणवेशात त्याठिकाणी आले. त्यांनी बॅग घेवून जाणाऱ्याला सोबत घेवून गेले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांकडून १६ लाखांची रोकड जप्त करण्यात आली असून त्यांना रात्री उशिरापर्यंत अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती. अटकेची कारवाई सुरू असलेल्या पोलिस उप निरीक्षक प्रकाश मेढे, पोलिस नाईक योगेश शेळके व पोकॉ दिनेश भोई या तीन पोलिसांना थोड्याफार रकमेचा मोह चांगलाच महागात पडला आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाई अटळ असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
धुमाळ याने ते पोलीस पैशांची बॅग घेवून जाणाऱ्या व्यक्तीला पोलीस अधीक्षक कार्यालयात घेवून गेल्याचे धुमाळ यांनी विकास पाटील यांना सांगितले. त्यामुळे विकास पाटील आणि धुमाळ हे दोघे त्याठिकाणी पोहचले. मात्र पोलिसांनी याठिकाणी अशा प्रकरणात कोणालाही आणले नसल्याचे पाटील यांना समजले. त्यानंतर विकास पाटील यांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली. अधीक्षकांनी तक्रारीची तात्काळ दखल घेत पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्यानंतर या संपुर्ण घटनेचा उलगडा झाला. त्यानार ग्रामसेवक विकास पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सचिन धुमाळ याच्यासह इतर तीन अनोळखी अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेचा तपास करीत असताना रेल्वे स्टेशनवर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यात आला. यामध्ये पोलीस मुख्यालयात नियुक्तीस असलेले पोलिस उप निरीक्षक प्रकाश मेढे, पोलिस नाईक योगेश शेळके यांच्यासह पोकॉ फैजपूर येथील दिनेश भोई हे तिघ गेल्याचे समले. तसेच रक्कम घेऊन जाणारा हा निलेश अहिरे असल्याचे समजल्यानंतर त्या पाचही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला आणि या संपुर्ण घटनेचा मास्टरमाईंड हा मुख्यालयात कार्यरत असलेला पोलिस नाईक योगेश शेळके हाच असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.