
जळगाव मिरर | ९ जून २०२५
देशातील इंदूरच्या राजा रघुवंशी यांच्या हत्येप्रकरणी मेघालय पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी पत्नी सोनमसह तीन आरोपींना अटक केली आहे. मेघालयच्या पोलिसांनी, “राजा रघुवंशी यांच्या हत्येसाठी मारेकऱ्यांना पैसे देण्यात आल्याची खळबळजनक माहिती दिली आहे.
डीजीपी आय नोंगरांग यांनी या प्रकरणी मोठा खुलासा केला आहे. त्यांनी या प्रकरणी माहिती देताना, “एक आरोपी उत्तर प्रदेशातून पकडला गेला, तर इतर दोघांना एसआयटीने इंदूरमधून ताब्यात घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “सोनमने उत्तर प्रदेशातील नंदगंज पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले आणि नंतर तिला अटक करण्यात आली.”
शनिवारी एका टूर गाईडने सांगितले होते की, इंदूरचे हनिमून कपल राजा रघुवंशी आणि त्यांची पत्नी सोनम यांच्यासोबत मेघालयातील सोहरा परिसरातून बेपत्ता झालेल्या दिवशी इतर तीन लोकही उपस्थित होते. गाईडने ही माहिती पोलिसांना दिल्याची पुष्टी एका अधिकाऱ्याने केली. मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड के संगमा यांनी ट्विट केले. त्यात त्यांनी, इंदूर राजा हत्याकांड प्रकरणात मेघालय पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात मध्य प्रदेशातील तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे, महिलेने आत्मसमर्पण केले आहे आणि दुसऱ्या हल्लेखोराला अटक करण्याची कारवाई अजूनही सुरू आहे.” असे म्हटले आहे.
इंदूरमधील हे जोडपे ११ मे २०२५ रोजी लग्नानंतर हनिमूनसाठी शिलाँगला गेले होते. ते २० मे रोजी मेघालयात पोहोचले आणि २३ मे रोजी कुटुंबाशी शेवटचे बोलले. त्यानंतर त्यांचे दोघांचेही फोन बंद होते.
सोहरारीम परिसरात या जोडप्याची भाड्याने घेतलेली स्कूटी बेवारस अवस्थेत आढळली. त्यानंतर २ जून रोजी वेई सोडोंग धबधब्याजवळील एका नाल्यात राजा रघुवंशीचा कुजलेला मृतदेह आढळला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. पत्नी सोनमचा कोणताही पत्ता लागला नाही, ज्यामुळे कुटुंबाला अपहरण किंवा तस्करीचा संशय येऊ लागला.
इंदूरचे वाहतूक व्यावसायिक राजा रघुवंशी यांचे ११ मे रोजी सोनम रघुवंशीशी लग्न झाले. राजाचा मृतदेह सापडल्यापासून पोलिस सोनमचा शोध घेत होते. आता सोनम गाजीपूरमध्ये सापडल्यानंतर, शिलाँगमध्ये या जोडप्याचे काय झाले आणि राजा कसा मरण पावला हे लवकरच कळेल.