जळगाव मिरर | ८ ऑक्टोबर २०२४
राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची तयारी असताना जळगाव शहर विधानसभा मतदारसंघासाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी शिवसेनेला मिळावी असा दावा जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांनी केल्याने जळगावत राजकीय खळबळ उडाली आहे.
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यावर शिवसेनेने देखील जळगाव जिल्ह्यातील एका जागेवर दावा केला होता मात्र भाजपच्या विनंतीला मान देऊन लोकसभा निवडणुकीमध्ये जळगाव जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात भाजपचे उमेदवार असल्याने या दोन्ही उमेदवाराचा प्रचार शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत जोरदार केला होता. त्यामुळेच भाजपाला मोठे यश देखील आले आहे. मात्र आता विधानसभा निवडणूक समोर येऊन ठेपली असून जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे संख्याबळ देखील जास्त असून जिल्ह्यात शिवसेनेची ताकद देखील मोठी आहे. त्यामुळे जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ देखील शिंदेंच्या शिवसेनेला सोडावा अशी मागणी वरिष्ठ नेत्यांकडे जळगाव जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांनी केले असल्याची माहिती मिळाली आहे.
जळगाव जिल्ह्यात शिवसेनेची मोठी ताकद असून लोकसभेला भाजपला शिवसेनेने मदत केली त्यामुळे आता येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने मदत केली तर शिवसेनेची जागा निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडे जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाची जागा देण्यात यावी अशी आग्रही मागणी केली असल्याची माहिती जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांनी दिले आहे.
