जळगाव मिरर | ११ सप्टेंबर २०२६
पिंप्राळे येथे सालाबादप्रमाणे यंदाही बैलपोळा सण मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी गावासह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, शेतकरी बांधव आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बैलपोळ्यानिमित्त सर्जा-राजाची गावातून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या बैलांचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले. घरोघरी महिला भगिनींनी बैलांना पुरणपोळी खाऊ घालून त्यांचे औक्षण केले. त्यामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. बैलपोळा हा केवळ शेतकरी आणि बैलांचा सण नसून, पशुधनाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा आणि ‘भूतदया करा, प्राण्यांवर प्रेम करा’ असा संदेश देणारा सण असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
दरम्यान, शेतकरी बांधवांनी वरुणराजाकडे यंदा भरघोस पाऊस पडू दे, शेतीला चांगले दिवस येऊ दे आणि ‘बळीचं राज्य येऊ दे’, अशी मनोभावे प्रार्थना केली. या उत्सवात माजी सरपंच धरमसिंग पाटील, माजी पोलीस पाटील विष्णू पाटील, विकास सोसायटीचे चेअरमन अनिल भीमसिंग पाटील, रमेश धनगर, प्रकाश कोळी, अशोक पाटील, मयूर धनगर, योगेश धनगर, राकेश कोळी, जयदीप धनगर, ओम धनगर, टेलर, गुमानसिंग राजपूत तसेच अभिजीत पाटील यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्जा-राजासोबतच त्यांच्या मालकांचेही उत्साहात स्वागत करण्यात आले. पारंपरिक संस्कृती आणि शेतकरी जीवनाशी असलेले नाते जपत पिंप्राळ्यात बैलपोळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.




















