जळगाव मिरर | १८ एप्रिल २०२५
चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील २७ वर्षीय गरोदर महिलेचा १५ रोजी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास उपचार सुरू असताना नवजात बालकासह शहरातील खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी संबंधित डॉक्टरवर कुठलीही कारवाई अद्याप झालेली नसल्याचे समजते.
सविस्तर वृत्त असे कि, चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील २७ वर्षीय मजुरी करणाऱ्या परिवारातील गरोदर महिला शहरातील एका खासगी रुग्णालयात तीन ते चार दिवसापासून उपचार घेत होती. दरम्यान, गरोदर राहिल्यापासून याच रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. १५ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास त्या महिलेला प्रसुतीचा त्रास जाणवू लागला. तिने लागलीच नातेवाईकांना सांगितले. तर त्यांनी रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांना सांगून लवकर डॉक्टरांना बोलवण्याची विनंती केली.
डॉक्टर पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास उपचारासाठी आले. मात्र, त्या गरोदर महिलेला असह्य वेदना होत असल्याने डॉक्टरांनी उपचार ही सुरू केले. पण उपचार सुरू असताना नवजात बालकासह त्या महिलेचा ही मृत्यू झाला. यामुळे डॉक्टर गोंधळात पडले. त्यानंतर त्यांनी लागलीच इतर डॉक्टरांना बोलावले. तसेच रुग्णाच्या नातेवाईकांशी बोलण्यासाठी समाजातील काही प्रतिष्ठितांना ही बोलावले. त्यांच्या माध्यमाने हे प्रकरण मिटवले.
मृत गरोदर महिलेचे कुटुंब गरीब, मजुरी करणारे असल्याने त्यांची ठामपणे बाजू मांडणारे कुणीही तेथे नव्हते. परंतु, त्यांचे नातेवाईक हंबरडा फोडत ‘डॉक्टर तुम्ही लवकर आले असते तर आमची मुलगी वाचली असती’ अशा वारंवार विनवण्या करत रडत होते. मात्र, त्यांच्याकडे लक्ष देणारे कुणीही नव्हते. दरम्यान, डॉक्टरांनी लागलीच रुग्णवाहिका बोलवून मृत गरोदर महिलेला शवविच्छेदनासाठी पाठवले. याबाबत आतापर्यंत पोलिसांकडे कुठलीही तक्रार प्राप्त न झाल्याने कारवाई करण्यात आलेली नाही. तरीही वैद्यकीय प्रशासनाने नवजात बालकासह मृत महिलेची गांभीर्याने दखल घेतली तर त्या बेफिकिर डॉक्टरांवर नक्कीच कारवाई करता येईल. या प्रकरणाकडे वैद्यकीय प्रशासन काय कारवाई करते? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.