जळगाव मिरर | ६ जून २०२५
आजारातून बरे होण्यासाठी सोनपोत मंत्रवून देण्याचा बहाणा करीत कस्तुराबाई लक्ष्मण पाटील (वय ६०, रा. जामणेगाव, ता. पाचोरा) यांच्या गळ्यातील सोनपोत हातचालाखी करीत लांबविल्याची घटना घडली होती. या प्रकरणी गुलजार लाठिया बजरंगी (वय ७७, रा. जाखणीनगर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. या प्रकरणात बजरंगी याच्या मुलाचाही समावेश असून त्याचा शोध घेतला जात आहे.
सविस्तर वृत्त असे कि, नवीन स्थानक परिसरातील भजेगल्लीतून मुलाच्या घरी पायी जात असलेल्या कस्तुराबाई पाटील यांना एकाने थांबवले. त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याजवळील सोन्याची पोत दोन अज्ञातांनी हाताचालाखी करीत लांबविल्याची घटना दि. १५ रोजी घडली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना फसवणूक करणारे हे बाप-बेटे असून ते शहरातील जाखणी नगरात राहत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी त्यांनी उपनिरीक्षक शरद बागल, सहायक फौजदार अतुल वंजारी, अक्रम शेख, हरिलाल पाटील, विजय पाटील, प्रवीण भालेराव, किशोर पाटील यांचे पथक तयार करुन कारवाईच्या सूचना दिल्या.
गेल्या काही दिवसांमध्ये रस्त्याने जात असलेल्या वृद्धांना हेरुन त्यांचा विश्वास संपादन केला जातो. त्यानंतर त्यांना खोटे सांगून त्यांच्याजवळील सोने काढून ठेवण्यास सांगून ते सोन्याचे दागिने हातचालाखी करीत लांबवित असल्याच्या अनेक घटना घडल्या आहे. त्यामुळे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे. तसेच फरार असलेल्या मुलाचा देखील पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित गुलजार बजरंगी यांना ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने मुलासह गुन्हा केल्याची कबुली दिली. गुलजार याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही जप्त करण्यात आली.
