जळगाव मिरर | १२ जानेवारी २०२४
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज राज्यात दौऱ्यावर असून नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन त्यांनी केले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महाराष्ट्रातील नेते उपस्थित होते.
यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच एकनाथ शिंदे यांचा उल्लेख महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून केला. व्यासपीठावरील मान्यवरांच्या नावाचा परिचय करून दिल्यानंतर मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. मला महाराष्ट्राच्या वीरभूमीत येण्याची संधी मिळाली याचा मला अतिशय आनंद आहे. त्यांना मी कोटी कोटी वंदन करतो, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी भाषणाची सुरुवात केली. पंतप्रधानांनी मराठी भाषणातून सुरुवात करताच उपस्थितांमधून टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला.
नाशिकमध्ये होत असलेल्या राष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा देताना त्यांनी राजमाता जिजाऊ यांना वंदन केलं आणि याच दिवशी आपल्याला महाराष्ट्राने संधी दिल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्राचे आभार मानले. नाशिकमध्ये आयोजित युवा महोत्सवाच उद्घाटन आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. त्यानंतर त्यांनी आज तरुणांना आणि देशवाशियांना संबोधित केलं. देशातील तरुणांकडून देशाला सर्वात जास्त अपेक्षा आहेत. तरुणींचही देशाच्या विकासात तेवढंच महत्त्व आहे. त्यांनी तेवढाच हातभार लावला आहे. लोकशाहीत तरुणांचा जीतका सहभाग असेल तितकी लोकशाही अधिक मजबूत बनेल. घराणेशीहीच्या राजकारणाला आळा घालता येईल. येणाऱ्या काळात तरुणांनी हे काम केलं पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.
आज भारत एकापेक्षा एक रेकॉर्ड तोडत आहे. मोठं मॅन्युफॅक्चरींग हब बनत आहे. याचं सर्व श्रेय्य युवकांना जातं. चांद्रयान, आदित्य आदित्य एल-१ चं यश जगासमोर आहे. येत्या काळात तरुणांनी असं काम करावं की येणाऱ्या पिढ्या नाव घेतील. इतिहास प्रत्येक वेळी एक संधी देतो. ती संधी आपल्याला अमृतकाळाच्या रुपाने मिळाली आहे. या काळात देशाला अजून पुढे न्यायचं आहे. याच काळात भारताचं नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाईल आणि भारताच्या तरुणावही याची जबाबदारी असून ते ही जबाबदारी स्वीकारतील अशी आशा मोदींनी व्यक्त केली.
आयुर्वेदाचं महत्त्व संपूर्ण जगाने मान्य केलं आहे. आपल्या पूर्वजांनी जतन केलेली ही उपचार पद्धती आज जगाला भारताची देण आहे. मात्र ब्रिटीशाच्या काळात आयुर्वेदाचं महत्त्व कमी झालं. वसाहतवादात ही उपचार पद्धती लोप पावत चालली होती. मात्र गेल्या दहा वर्षात तिला नवसंजीवनी मिळाली आहे. नारीशक्तीचं देशातील योगदान कधीही विसरता येताणार नाही. आज तितकचं योगदान आहे. मात्र तिचा पदोपदी होणारा अपमान, मानहानी थांबली पाहिजे. लाल किल्ल्यावरून आपण यावर भाष्य केलं होतं. आज परत देशाला आवाहन करत आहे की महिलांचा सन्मान करा. त्यांना समाजात योग्य स्थान द्या.