जळगाव मिरर | १२ सप्टेंबर २०२४
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संध्याकाळी सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी जाऊन गौरी-गणपतीची आरती करून दर्शन घेतले. याचा व्हिडिओ समोर आला आहे. पण पीएम मोदींनी सरन्यायाधीशांच्या घरी जाण्यावरुन जोरदार टीका करण्यात आली आहे. यामुळे न्यायालयीन निःपक्षपातीपणाबद्दल जनतेच्या मनात शंका निर्माण होऊ शकते, असा शब्दांत ठाकरेंच्या शिवसेनेने आक्षेप नोंदवला आहे. राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे की, “गणेश चतुर्थीत लोक एकमेकांच्या घरी जातात. पंतप्रधानांनी आतापर्यंत किती घरांना भेटी दिली याची माहिती माझ्याकडे नाही. दिल्लीत आमचे महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र मंडळासह अनेक ठिकाणे आहेत.”
“पण पीएम मोदींनी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानी भेट दिली आणि त्यांनी एकत्र गणपतीची आरती केली. संविधानाच्या रक्षकांनी अशा प्रकारे राजकीय नेत्यांची भेट घ्यावी की नाही ही आमची चिंता आहे. कारण यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण होते,” असे राऊत यांनी पुढे म्हटले.
”EVM ला क्लीन चीट, महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या घटनाविरोधी सरकारच्या सुनावणीला तारीख पे तारीख, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या जामीनावर तारीख पे तारीख… हे सर्व का होत आहे? क्रॉनॉलॉजी समजून घ्या,” अशी प्रतिक्रिया राऊत यांनी पीएम मोदी यांचा CJI चंद्रचूड यांच्या घरातील गणपती आरतीचा व्हिडिओ शेअर करत दिली. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. पण आम्हाला न्याय मिळेल की नाही? याबद्दल शंका वाटते. आमच्या केसमध्ये, केंद्र सरकार प्रतिपक्ष आहे. सरन्यायाधीशांनी या खटल्यापासून स्वतःला दूर ठेवावे. कारण त्यांचे या खटल्यातील अन्य पक्षाशी असलेले संबंध जगजाहीर आहेत. अशा परिस्थितीत सरन्यायाधीश आम्हाला न्याय देऊ शकतील का?, असा सवाल राऊत यांनी केला.