जळगाव मिरर | २९ डिसेंबर २०२३
जळगाव: ‘निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योग असे अभुतपूर्व छत्रपती शिवाजी महाराज यांचे वर्णन आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या प्रत्येक कृतीतून एक शिकवण दिली आहे. ही शिकवण समाजात खर्या अर्थाने रूजावी या संकल्पनेवर आधारीत गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील यांनी निर्मीत केलेल्या हिंदवी स्वराज्य या अभिनव दिनदर्शिकेचे गुरूवारी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांच्या हस्ते थाटात प्रकाशन करण्यात आले.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या 350 व्या वर्षा निमित्ताने हिंदवी स्वराज्य दिनदर्शिका 2024 निर्माण करण्यात आली. या समारंभाला मंचावर दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे संस्थापक विश्वस्त वैभव डांगे, गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील उपस्थित होते. तसेच प्रमुख मान्यवर म्हणून हृदयविकार तज्ञ डॉ. वैभव पाटील, संस्थापक, विश्वस्त दिल्ली मराठी प्रतिष्ठान अभिजित गोडबोले, मोहन काकटीकर, माजी मिलिट्री सेक्रेटरी,मुख्य कार्यकारी अधिकारी, व्हीआयसी मॅक कॉर्पोरेशन,जनरल सेक्रेटरी, श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरिअल नॅशनल कमेटी,जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री दिल्ली ,कार्यकारी अध्यक्ष मराठा मित्र मंडळ उपस्थित होते. यावेळी डॉ. केतकी पाटील यांनी माहिती देतांना हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे 350 वे वर्ष साजरे केले जात आहे.या निमित्तने ही संकल्पना आली. या दिनदर्शिकेत महाराजांच्या कार्यकाळातील त्या – त्या तारखेला घडलेल्या घटना, त्या वर्षाच्या उल्लेखासह आहेत. या दिनदर्शिकेत महाराजांची तत्वे ठळकपणे मांडली आहेत त्यामुळे याचा लाभ विद्यार्थ्यांना होईलच, संग्रही ठेवता येईल अशी ही दिनदर्शिका असल्याचे डॉ. केतकी पाटील यांनी सांगितले.
शिवस्मरण होणार्या उपक्रमांची गरज – डॉ. सहस्त्रबुध्दे
छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मरण हे केवळ शिवजयंतीपुरता न राहता ते रोज व्हावे यादृष्टीने डॉ. केतकी पाटील यांनी हिंदवी स्वराज्य दिनदर्शिकेची संकल्पना मांडली आहे. छत्रपती शिवरायांचे जीवन आणि त्यांचे कार्य काय होते? हे भावी पिढीला कळावे यासाठी अशा दैनंदीन शिवस्मरण होणार्या उपक्रमांची आज खर्या अर्थाने गरज असल्याचे मत भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांनी व्यक्त केले. तसेच डॉ. केतकी पाटील यांनी मांडलेल्या या अभिनव संकल्पनेचेही त्यांनी कौतुक केले.
अशी आहे दिनदर्शिका
हिंदवी स्वराज्य दिनदर्शिका 2024 मध्ये मोठी स्वप्न, कुशल संघटक, कठोर परिश्रम, न्यायप्रियता, कृतिशिलता, दूरदर्शी योजक, आर्थिक शिस्त, प्रथमपुरूषी वृत्ती, कालोचित नेतृत्व, चारित्र्य संपन्न व्यवहार, धर्मधिष्ठीत राज्यकारभार, रयतेचा राजा ह्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिकवणी भावी पिढीमध्ये रूजविण्याचा अभिनव प्रयत्न करण्यात आला आहे.