जळगाव मिरर | २६ फेब्रुवारी २०२४
राज्यात बंदी असलेल्या पानमसाला, सुगंधित तंबाखू, गोड सुपारीचा साठा केलेल्या गोदामावर कारवाई करत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने छापा टाकला. या ठिकाणाहून १४ लाख रुपयांचा साठा जप्त केला. ही कारवाई औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या दोन गोदामांमध्ये करण्यात आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात हिरालाल उत्तम पाटील (वय ३८, रा. पिंप्राळा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील औद्योगिक वसाहत परिसरातील गोदामात गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखूचा साठा केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली. त्यानुसार या विभागाचे नाशिकचे सहाय्यक आयुक्त एम.एम. सानप यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार, अमित रासकर, गोपाल कासार, उमेश सूर्यवंशी यांनी औद्योगिक वसाहत परिसरात जाऊन कारवाई केली.
यात एच व एम सेक्टरमधील दोन गोदामांची तपासणी केली असता तेथे १४ लाख एक हजार ६१२ रुपये किमतीचा सुगंधित पानमसाला, सुगंधित तंबाखू, स्वीट सुपारी याचा साठा आढळून आला. हा साठा पथकाने ताब्यात घेतला.या विषयी अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गोदाम मालक हिरालाल पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि नीलेश गोसावी करीत आहेत.