जळगाव मिरर | १६ जुलै २०२६
जळगाव तालुक्यातील खेडी गावात भरधाव वेगाने धावणाऱ्या वाळूच्या डंपरने पादचारी तरुणाला चिरडल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली. या भीषण अपघातात प्रीतम संभाजी पाटील (वय ३५, रा. श्रीकृष्णनगर, खेडी) याच्या दोन्ही पायांवरून डंपर गेल्याने त्यांचे अक्षरशः चेंदामेंदा झाले. गंभीर जखमी अवस्थेत त्याच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

माहितीनुसार, बुधवारी रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास खेडी गावातील अरुंद रस्त्यावरून वाळूने भरलेले डंपर भरधाव वेगाने जात होते. त्याचवेळी प्रीतम पाटील हे पायी घरी जात असताना एका भरधाव डंपरने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर ते रस्त्यावर कोसळले आणि डंपर त्यांच्या दोन्ही पायांवरून गेल्याने गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या. घटना लक्षात येताच ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत जखमी प्रीतम यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना अतिदक्षता विभागात उपचारासाठी ठेवले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, जखमी प्रीतम पाटील हे नाशिक येथील एका खासगी फायनान्स कंपनीत नोकरीला आहेत. आई आणि भावाला भेटण्यासाठी ते पाच ते सहा दिवसांच्या सुट्टीवर खेडी येथे आले होते. मात्र घराकडे जात असतानाच या भीषण अपघाताला त्यांना सामोरे जावे लागले. अपघातानंतर डंपरचालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला. माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत फरार डंपर आणि चालकाचा शोध सुरू होता.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शहर आणि ग्रामीण भागातील वस्तीमधून अवैध वाळू वाहतूक करणारे भरधाव डंपर बिनधास्तपणे धावत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. एका बाजूला पोलिसांकडून अवैध धंद्यांविरोधात मोहीम राबविली जात असताना, दुसरीकडे वाळू वाहतुकीवर प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांनी पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या अपघातानंतर खेडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अवैध वाळू वाहतुकीवर तातडीने कठोर कारवाई करून अशा डंपरांवर नियंत्रण आणण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.




















