
जळगाव मिरर | २८ मे २०२६
जिल्ह्यातील रावेर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रावेर तालुक्यातील एका २२ वर्षीय महाविद्यालयीन युवतीचे ११ मे रोजी अपहरण करून, तिला गुंगीचे औषध पाजून आळंदी येथे नेण्यात आले. तिथे बळजबरीने तिचा विवाह लावून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुख्य आरोपीसह १० जणांविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ मे रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास, संशयित आदित्य महाजन याने तरुणीला “तुझ्याशी काम आहे” असे सांगून दुचाकीवर बसवले आणि हतनूर गावापर्यंत नेले. त्याठिकाणी अगोदरच कारमध्ये बसलेले आरोपीचे वडील, भाऊ व इतर नातेवाइकांनी पीडितेला पिण्याच्या पाण्यातून गुंगीकारक औषध दिले; यामुळे पीडिता बेशुद्ध झाली.
युवतीला बेशुद्ध अवस्थेतच तरुणीचे कारमधून आळंदी येथे पळवून नेण्यात आले. तेथे संशयिताचा मावसभाऊ, चालक आणि मित्राच्या मदतीने पीडितेसोबत बळजबरीने विवाह उरकला. लग्नानंतर पुणे येथील एका रूममध्ये दि. ११ ते १७ मे दरम्यान, पीडितेचे फोटो सोशल मीडियावर आणि नातेवाइकांना पाठविण्याची धमकी देत वेळोवेळी अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी या तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम : ६४ (१), ६४ (२) (एम), १२३, ८७, ३५१ (२) (३), आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदित्य राजू महाजन, त्याचे वडील राजू महाजन, हरदास महाजन, दिनकर महाजन व भाऊ गणेश महाजन, रुपेश महाजन, निकिता महाजन यांच्यासह विरोदा येथील संशयिताचा मावसभाऊ व अन्य मित्र अशा दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





















