जळगाव मिरर | १७ जुलै २०२४
राज्यातील पंढरपुरात आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक ही शासकीय महापूजा पार पाडली. भाविकांची विक्रमी गर्दी, टाळ मृदुंगाचा जयघोष, भजन, हरिनामाच्या गजराने अवघी पंढरपूर नगरी दुमदुमली आहे.
आषाढी एकादशीनिमित्त यंदा विठ्ठल-रखुमाईच्या शासकीय पुजेचा मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाला. त्यांच्या सोबतच नाशिक जिल्ह्यातील बाळू शंकर अहिरे व आशा बाळू अहिरे या वारकरी दाम्पत्याला शासकीय महापूजेसाठी उपस्थित राहण्याचा मान मिळाला. अहिरे दाम्पत्य हे नाशिक जिल्ह्यातील अंबासन येथील रहिवासी आहे. हे दाम्पत्य गेल्या 16 वर्षांपासून अखंडपणे पंढरपूरच्या वारीत सहभागी होत वारी करत आहेत.
आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात भविकांची मांदियाळी बघावयास मिळत आहे. जवळपास 15 लाख भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपुरा दाखल झाले आहेत. चंद्रभागेच्या तिरावर स्नानासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी झाली आहे. विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आपल्या कुटुंबासोबत रुक्मिणीच्या पूजेला गेले. त्यांच्यासोबत मानाचे वारकरी अहिरे दाम्पत्य देखील होते. रुक्मिणी मातेला दुग्धाभिषेक मुख्यमंत्र्यांनी पूजा केली. प्रसाद म्हणून शिंदेंना श्रीफळ, तुळशी हार आणि विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा देण्यात आली.
राज्यातील वारकरी, शेतकरी सुखी होऊ दे, चांगला पाऊस पडू दे, पिक चांगले येऊ दे, बळीराजाला सुखी-समाधानी राहू दे, असे साकडे आपण विठुरायाच्या चरणी घातल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, यंदा पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मोठ्या संख्येने वारकरी, बंधू-भगिणी दर्शनाला आले आहेत. राज्यातील कष्टकरी, शेतकरी आणि प्रत्येक घटकाला चांगले आणि सुगीचे दिवस येऊ दे, अशी प्रार्थना आपण विठुरायाच्या चरणी केल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.