
जळगाव मिरर | १० जून २०२५
गेल्या आठ दिवसापासून जून महिन्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात देखील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची लगबग सुरू झाली आहे. प्रत्येक पालक आपल्या मुलांसाठी उत्कृष्ट शाळेमध्ये प्रवेश मिळावा व त्यांना पाठ्यपुस्तक देखील उत्तम मिळावे यासाठी प्रयत्न करत असतो. मात्र शिक्षण विभागात शाळा प्रशासन व छोट्या-मोठ्या दुकानदाराने ‘खेळखंडोबा’ करून ठेवल्याचे चित्र सध्या जळगाव शहरात निर्माण झाले आहे त्यामुळे जळगाव जिल्हा परिषदेचे शिक्षण विभाग यावर कुठली कारवाई करेल याकडे बघणे महत्त्वाचे ठरत आहे.
राज्यातील सरकार मुला मुलींना शिक्षण मिळावे यासाठी अनेक नवे धोरण आखत असताना जळगाव शहरात सध्या पालक वर्ग उत्तम शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा व त्यांची गुणवत्ता चांगली व्हावी यासाठी शाळेत प्रवेश घेत आहे मात्र शाळा सुरू होताच अनेक पालकांना शाळा प्रशासनाकडून काही निवडक दुकानातून पुस्तक वही व गणवेश घेण्यासाठी सक्ती करण्यात येत असल्याने त्यामुळे जळगाव शहरातील पालकांची आर्थिक लूट होत आहे. तरीदेखील या शैक्षणिक क्षेत्रात झालेल्या ‘खेळ खंडोबा’ वर कारवाई करावी अशी मागणी पालकांमध्ये नाव न सांगता करण्यात येत आहे याकडे जळगाव जिल्हा परिषदेचे शिक्षण विभाग कुठली कारवाई करणार याकडे आता लक्ष लागून आहे.
शाळेमधून दिले जाते व्हिजिटिंग कार्ड !
जळगाव शहरातील एका शाळेत चक्क शाळेतील शिक्षकांच्या माध्यमातून एका दुकानाचे व्हिजिटिंग कार्ड दिले जाते व त्याच दुकानातून शाळेचा गणवेश खरेदी करावा अशी शक्ती देखील केली जाते जर काही पालकांनी या दुकानातून ड्रेस खरेदी न करता बाहेरून घेतला तर विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्यानंतर यावर कुठलाही शाळेचा शिक्का नाही यामुळे त्रास दिला जातो असल्याचे मागील वर्षी समजले होते.
पार्किंग मध्येच थाटले बुक डेपो चालकांने दुकान !
जळगाव शहरातील एका मध्यवर्ती भागात शाळेच्या गेट समोरील एका इमारतीच्या पार्किंग मध्ये एका बुक डेपो चालकाने दुकानच थाटले आहे याची कुठलीही परवानगी न घेता या ठिकाणी शेकडो वही पुस्तक व गणवेश विक्री करत आहे याची कुठलीही प्रकारची पावती किंवा बिल न देता साध्या कागदावर बिल देऊन अनेक पालकांची हे दुकानदार महोदय फसवणूक करीत आहे. तरीदेखील शिक्षण विभाग याकडे कानाडोळा करत आहे.