
जळगाव मिरर | १० जून २०२५
राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत असतांना आता दौंड तालुक्यातील भरतगाव येथे पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका विवाहित महिलेला तिच्या पतीने स्वतःच्या तीन मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती केली असल्याची तक्रार पीडित महिलेने यवत पोलीस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीनंतर पतीसह त्याच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही आपल्या पतीसोबत भरतगाव येथे राहत होती. सन २०२३ पासून ते एप्रिल २०२५ पर्यंत तिच्यावर वेळोवेळी मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. तिच्या इच्छेविरुद्ध तिला घरी व शेतात पतीच्या तीन मित्रांसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले गेले. या प्रकारामुळे मानसिकरित्या खचलेल्या महिलेने अखेर यवत पोलीस ठाण्यात धाव घेतली.
आरोपी पतीसह त्याच्या तीन मित्रांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (१), ७० (१), ३३३, ३५२, ३५१ (२)(३), ३(५) अंतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास यवत पोलीस करत आहेत. या प्रकारामुळे दौंड तालुक्यात खळबळ उडाली असून, पती-पत्नीच्या विश्वासाच्या नात्याला तडे गेलेले दिसत आहेत. आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.