
जळगाव मिरर | २१ डिसेंबर २०२४
मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकातील एका पानटपरी धारकाला चाकूचा धाक दाखवून १० हजाराची रोख रक्कम घेत अज्ञात चौघांनी लुटल्याची घटना काल रात्री सव्वादहा वाजता घडली. दरम्यान, यात ३ जण जखमी झाल्याची पोलिसात नोंद आहे. परंतु, प्रत्यक्षात मात्र अज्ञात चोरट्यांनी एकावर गोळीबार केला असून त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. तर इतर दोघे चाकू हल्ल्यात जखमी झाल्याची तसेच यात लाखो रुपये चोरट्यांनी चोरून नेल्याची चर्चा आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगरातील प्रतिभानगर येथील मोबाईल शॉपीचे व्यावसायिक रवींद्र रमेश खेवलकर (वय ३६) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, चार अनोळखी व्यक्तींनी हा हल्ला केल्याची घटना १९ डिसेंबरला रात्री १०.१५ वाजता घडली. रवींद्र खेवलकर आपल्या पानटपरीजवळ उभे असताना चार अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला.
दोन चाकूंच्या मदतीने आरोपींनी खेवलकर यांच्या हातातील पिवळ्या रंगाच्या पिशवीतील १० हजार रुपये हिसकावून नेले. या हल्ल्यात फिर्यादी किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पो.नि. नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. तपास पोलीस हवालदार मोहम्मद तडवी यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. तर सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे. या घटनेमुळे मुक्ताईनगर शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाने त्वरीत आरोपींना पकडावे, अशी मागणी होत आहे.