जळगाव मिरर | ७ ऑगस्ट २०२५
हॉटेल बंद करुन घरी परतणाऱ्या प्रमोद श्रीराम बाविस्कर (रा. चंदूआण्णानगर) यांच्यावर गोळीबार करणाऱ्यांचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. ही घटना राजकीय वैमनस्यातून झाली असून पुनगावच्या सरपंचाने मित्रांच्या मदतीने मध्यप्रदेशातील दोघांना खूनाची सुपारी दिल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले. याप्रकरणी सरपंचासह पाच जणांना अटक केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील चंदू आण्णा नगरात राहणारे प्रमोद बाविस्कर यांचे डोणगाव शिवारात हॉटेल आहे. हॉटेल बंद करुन ते घरी परतत असतांना दुचाकीवर आलेल्यांनी प्रमोद बाविस्कर यांच्यावर गोळीबार करीत त्यांना जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना दि. १० जुलै रोजी घडली होती. या गुन्ह्याच गांभीर्य लक्षात घेता हा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी वेगवेगळे पथक रवाना केले होते. या पथकाने घटनास्थळावरील पुरावे व तांत्रिक विश्लेषण करीत संशयित दर्शन रवींद्र देशमुख (वय २५, रा. देशमुख वाडा, अडावद, ता. चोपडा), गोपाल संतोष चव्हाण (वय २५, रा. अडावद, ता. चोपडा), सरपंच किशोर मुरलीधर बाविस्कर (वय ४०, रा. कोल्हे हिल्स), विनोद वसंतराव पावरा (वय २२, रा. अमलवाडी, ता. चोपडा), सुनील सुभाष पावरा (वय २२, रा. उमर्टी, ता. चोपडा) यांच्या नाशिक, उमर्टी आणि अडावद येथून मुसक्या आवळल्या.
गोळीबार प्रकरणातील संशयितांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी एक गावठी कट्टा अक्षय अजय जयस्वाल (वय २४, रा. शिवाजी नगर) याला विकल्याचे तपासात उघड झाले. त्यानुसार पथकाने आंबेडकर मार्केट परिसरात (एमएच १९, बीके ८८९३) क्रमांकाच्या दुचाकीच्या शिटखालून गावठी कट्टा व पाच जीवंत काडतूस जप्त करण्यात आले.
यांनी केली कारवाई
ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपअधीक्षक विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. संदीप पाटील, रंगनाथ धारबळे, सपोनि अजयकुमार वाढवे, पीएसआय शरद बागल, सोपान गोरे, जितेंद्र वाल्टे, पोहेकॉ सुनिल दामोदरे, प्रीतम पाटील, यशवंत टहाकळे, मुरलीधर धनगर, प्रवीण भालेराव, विलेश सोनवणे, संदीप पाटील, दीपक माळी, रविंद्र पाटील, विष्णू बिऱ्हाडे, बबन पाटील, सिद्धेश्वर डापकर, रावसाहेब पाटील, ईश्वर पाटील, गोपाल पाटील, प्रदीप चवरे, रविंद्र चौधरी, महेश सोमवंशी, बाबासाहेब पाटील, पोहेकॉ नरेंद्र वारुळे, वासुदेव मराठे, संदीप सुर्यवंशी, किशोर परदेशी, सचिन पाटील, योगेश खोंडे, भरत कोळी, सागर कोळी यांच्या पथकाने केली.
