जळगाव मिरर | २५ जून २०२४
राज्यातील नाशिक शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सिडको परिसरातील एका शाळेत इयत्ता सहावीत शिकणाऱ्या 11 वर्षाच्या मुलीचा वर्गातच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चक्कर येऊन बेंच वरुन खाली पडून या विद्यार्थ्यानीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मुलीचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिव्या त्रिपाठी असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. वर्गात चक्कर येऊन पडल्याने तिला तत्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. दरम्यान शाळेत अशाप्रकारे केवळ चक्कर येऊन मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे नक्की चक्कर येऊनच मृत्यू झाला आहे की यामागे आणखी काही कारण आहे अशी शंका उपस्थित होत असून पोलिस अधिक तपास करत आहेत.