जळगाव मिरर | २७ जुलै २०२४
राज्यातील अनेक शहरात गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारी घटना नियमित वाढत असतांना नुकतेच बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील नागझरी या गावात चौदा वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याची हतोड्याने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा राजेश्वर कराळे (वय १४) असं हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी शेगाव पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. रुपेश वारोकार (वय 22, रा. नागझरी) आणि पृथ्वीराज मोरे (वय 21, रा. नागझरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, हत्या केल्यानंतर मुलाचा मृतदेह भास्तनच्या जंगलात पोत्यामध्ये भरून फेकण्यात आला आहे. ही घटना समोर येताच संतप्त नातेवाईक आणि गावकऱ्यांनी काल (दि. २५) शेगाव पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. शेजाऱ्यानेच हे हत्याकांड केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेगाव तालुक्यातील नागझरी येथील 14 वर्षीय कृष्णा राजेश्वर कराळे हा 23 जुलैपासून बेपत्ता झाला होता. कृष्णा हा बुरुंगले विद्यालयात आठवीत शिक्षण घेत होता. हा मुलगा मंगळवारी सकाळी 10 वाजता शिकवणी वर्ग शाळेला गेला होता. सायंकाळपर्यंत तो परतला नसल्याने घरच्यांनी त्याचा शोध सुरु केला. अखेर त्याचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. दरम्यान, 23 जुलै रोजी सकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी कृष्णाला एक संशयित मोटारसायकलवरून घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आले. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. संशयिताच्या मोबाईलचे लोकेशन घेण्यात आले. त्यानुसार रुपेश वारोकार याला 24 जुलै रोजी सायंकाळी जळगाव जामोद येथून पोलिसांनी अटक केले. वारोकार या आरोपीची कसून चौकशी केली असता, अपहरण करून कृष्णाची हत्याच झाल्याची माहिती समोर आली. हत्येच्या कटात पृथ्वीराज मोरे हा देखील सहभागी असल्याचे आरोपीने सांगितल्याने त्याला देखील अटक केले असून मृत कृष्णाच्या शेजारचाच रुपेश वारोकार हा आरोपी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.