जळगाव मिरर | २९ ऑगस्ट २०२४
बदलापूर येथे घडलेल्या घटनेचा राज्यात आज देखील निषेध करण्यात येत असतांना व घटना ताजी असतांना असेच एक खळबळजनक प्रकरण खान्देशातील नंदुरबार शहरात उघडकीस आले आहे. येथील एका शाळेतील पाचवीच्या ११ वर्षीय विद्यार्थिनीला शाळेतील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याने मोबाइलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवून विनयभंग केल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून संबंधित कर्मचारी, संस्थाचालक आणि मुख्याध्यापिका यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे की, शहरातील एका नामांकित शाळेत पाचवीच्या विद्यार्थिनीस रोजंदारी सफाई कर्मचारी असलेल्या ५० वर्षीय व्यक्तीने मोबाइलमध्ये इंटरनेट सुरू करून दे असे सांगून त्यातील अश्लील चित्रफित दाखविली. मुलीने रात्री आईला घडलेला प्रकार सांगितला. सकाळी आईने शाळा गाठून याबाबत तक्रार केली. नंतर पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार सफाई कर्मचारी, संस्थेचे चेअरमन व मुख्याध्यापिका यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत शाळेने पत्रक काढले असून तक्रार येताच लगेच सीसीटीव्ही फुटेज तपासले. मुलीच्या आईच्या मागणीवरून ते त्यांनाही उपलब्ध करून दिले. मुलीच्या आईने फिर्याद दिल्याने दुसरी फिर्याद घेता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितल्याचे शाळेने स्पष्ट केले आहे. संबंधित कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकले आहे.