जळगाव मिरर | २८ ऑगस्ट २०२४
शहरात सर्वत्र दहीहंडीचा उत्सव सुरु असतांना भास्कर मार्केटसमोरील एका हॉटेलमध्ये दारु पित असलेल्या टोळक्याने गोळीबार केला. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. गोळीबार केल्यानंतर त्या टोळक्याने हॉटेलमधून पळ काढून ते पसार झाले. ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली असून पोलिस संशयीताचा शोध घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील भास्कर मार्केटसमोरील हॉटेल शालीमार येथे रविवारी सायंकाळी काही तरुण दारु पिण्यासाठी आले.दारु पित असतांना अचानक त्या टोळक्यातील एकाने त्याच्याजवळील पिस्तुल काढून जमीनिवर गोळीबार केला. मोठा आवाज झाल्याने हॉटेलमधील कर्मचारी घाबरुन गेले. गोळीबार केल्यानंतर त्या टोळक्याने हॉटेलचे बील भरुन तेथून पळ काढला. हॉटेल मधील कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती हॉटेल मालकाला दिली. त्यांनी लागलीच घटनेची माहिती जिल्हा पेठ पोलिसांना कळविली.
गोळीबार झाल्याची घटना ही सायंकाळी सात-साडेसात वाजेची आहे. मात्र जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुमारे तीन तासानंतर म्हणजेच रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांकडून चौकशील सुरुवात झाली. तपासणीत हॉटेलमधून गोळीबार केलेला रिकामा रऊंड मिळून आला. ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांकडून संशयिताचा शोध घेतला जात आहे.