जळगाव मिरर | १९ सप्टेंबर २०२४
राज्यातील अनेक ठिकाणी खळबळजनक घटना घडत असतांना नुकतेच नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरातील सराफनगर भागात अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी पती-पत्नीसह नऊ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याच्या घटनेने नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. विजय सहाणे, ज्ञानेश्वरी सहाणे व अनन्या सहाणे अशी मृतांची नावे आहेत. घटनास्थळी सुसाइड नोट आढळून आलेली नसली तरी या तिघांनी जीवनयात्रा संपवली असल्याचे प्रथमदर्शनी सांगितले जात आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच यासंदर्भात स्पष्टता होईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराफनगर भागातील प्रतिगंगा रो हाऊस क्रमांक १ मध्ये विजय सहाणे, पत्नी ज्ञानेश्वरी (३६), मुलगी अनन्या, वडील माणिक व आई लीलाबाई यांच्यासमवेत राहत होते. बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास अनन्या शाळेत जाण्यासाठी खाली आली नाही, म्हणून माणिक सहाणे वरच्या मजल्यावर गेले. दरवाजा बंद असल्याने त्यांनी आवाज दिला. बराच वेळ झाला तरी कोणीही दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी समोरील ओळखीच्या रहिवाशांना मदतीसाठी बोलावले. नागरिकांनी प्रयत्न करूनही दरवाजा न उघडल्याने अखेर त्यांच्याकडे आलेल्या दूधवाल्याने दरवाजा तोडला. माणिक सहाणे व नागरिकांनी खोलीत प्रवेश केला असता, त्यांना विजय, ज्ञानेश्वरी व अनन्या मृतावस्थेत दिसून आले. तिघांना या अवस्थेत पाहताच माणिक सहाणे यांनी हंबरडा फोडला. आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिकांनी तत्काळ सहाणे यांच्या घराकडे धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.