जळगाव मिरर | १२ डिसेंबर २०२४
राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतांना नुकतेच शाळकरी मुलगी गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. पुण्यातल्या लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये अल्पवयीन मुलाने शाळकरी मुलीला आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडित मुलगी गर्भवती राहिल्याचे कळताच तिच्या आईला धक्का बसला. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणीकंद पोलिस ठाण्यामध्ये धाव घेत मुलाविरोधात तक्रार दाखल केली. आरोपी मुलगा १७ वर्षांचा आहे.
पीडित मुलाच्या आईच्या तक्रारीनंतर लोणीकंद पोलिसांनी मुलाविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान आरोपी मुलाने पीडित मुलीला आमीष दाखवत तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ४ महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर पीडित मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर आईने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.