जळगाव मिरर | ६ ऑक्टोबर २०२४
देशातील उत्तर प्रदेश येथे यती नरसिंहानंद सरस्वती महाराज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करुन तक्रार देण्यासाठी सोशल डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे काही पदाधिकारी शुक्रवारी (दि. ४) रात्री नागपुरी गेट पोलिसांत पोहोचले होते. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
मात्र त्याचवेळी ठाण्याबाहेर हजारोंचा जमाव एकत्र आला व त्यांनी पोलिस ठाण्यावर तुफान दगडफेक केली. दगडफेकीत २१ पोलिस जखमी झाले असून ११ शासकिय वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचे १८ ते २० नळकांडे फोडले. या प्रकरणी पोलिसांनी १२०० जणांविरुद्ध जीवघेणा हल्ला व इतर कलामांनुसार गुन्हा दाखल करून धरपकड सुरू केली आहे.
जमावाने केलेल्या दगडफेकीत अधिकारी व अंमलदार असे २१ पोलिस जखमी झाले आहेत. तसेच पोलिसांच्या ११ शासकिय वाहनांचीसुध्दा तोडफोड करण्यात आली. परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे मुख्यालयातील अतिरिक्त कुमक, ग्रामीण पोलिसांची कुमक, एसआरपीएफला घटनास्थळी पाचारण्यात करण्यात आले होते. पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजतापासून नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीत जमावबंदी आदेश दिला होता.