जळगाव मिरर | २५ ऑक्टोबर २०२४
कौटुंबिक वादातून झालेल्या भांडणातून पतीने मारहाण केल्यामुळे पत्नी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्यानंतर मिलींद शशिकांत दलाल (वय ३८) यांनी आसाम येथे गेलेल्या मित्राला मोबाईलवर सुसाईट नोट पाठवून गळफास घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शहरातील चौघुले प्लॉट परिसरात घडली. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील चौघुले प्लॉट परिसरातील मिलींद दलाल याचा टेन्ट हाऊसचा व्यावसाय असून तो आई, पत्नी, सहा वर्षाची मुलगी, तीन वर्षाचा मुलगा यांच्यासोबत वास्तव्याला होता. कौटुंबिक कारणावरुन पतीपत्नीमध्ये त्यांचे नेहमी वाद होत होते. बुधवारी सायंकाळी त्यांच्यात वाद होवून भांडण झाले, यावेळी मिलींदने पत्नीला मारहाण केल्याने त्याची पत्नी पोलिसात तक्रार देण्यासाठी गेली होती. पत्नी पोलिस ठाण्यात गेल्यानंतर मिलींदे याने राहत्या घरातील तिसऱ्या मजल्यावर गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. मिलींदच्या वडीलांचे निधन झाले असून त्याची आई पुण्याला गेली होती. त्याच्या – पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी आणि दोन विवाहीत बहिणी असा परिवार आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर मिलींदच्या पत्नीसह पोलिसांनी त्यांच्या घरी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने त्याला खाली उतरवून शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले.
