
जळगाव मिरर | २१ जून २०२६

शिक्षण प्रसारक मंडळ, जळगाव संचालित शेठ लाना. सार्वजनिक विद्यालयात रविवार दिनांक 21 जून रोजी सकाळी 7 ते 9 या वेळेत’आंतरराष्ट्रीय योग दिन’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा, लोकमत सखी मंच , आणि आर्ट ऑफ लिविंग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे होते. यावेळी सु. ग. देवकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुषमा साळुंखे, उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप, आर्ट ऑफ लिविंगचे योगशिक्षक चंद्रशेखर पाटील, छाया पाटील, मंगेश जाधव, शाळेचे पर्यवेक्षक संजय वानखेडे आणि पर्यवेक्षिका रमा तारे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते देवता सरस्वती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना योगशिक्षक चंद्रशेखर पाटील म्हणाले की, “निरोगी आयुष्यासाठी नियमित योगसाधना करणे काळाची गरज आहे. योगा केवळ शरीर निरोगी ठेवत नाही, तर मनाची एकाग्रता वाढवून मानसिक स्थिती देखील सुदृढ करते.”
शाळेतील इयत्ता ५ वी ते १० वीच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आर्ट ऑफ लिविंगच्या योगशिक्षकांनी विद्यार्थ्यांना विविध योगासनांचे प्रात्यक्षिक करून दाखवले, ज्याचा विद्यार्थ्यांनी उत्साहाने सराव केला. मुख्याध्यापक सचिन देशपांडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून नियमित योगसाधनेचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक संजय वानखेडे यांनी केले. सूत्रसंचालन सोमनाथ महाजन यांनी केले, तर आभार
प्रदर्शन सुनीता रोटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.





















