जळगाव मिरर | १० फेब्रुवारी २०२६
सोशल मीडियावर मेहरुण तलावात सांडपाणी मिसळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नवनिर्वाचित महापौर दिपमाला मनोज काळे यांनी सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास मेहरुण तलाव परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी तलावात जाणाऱ्या सांडपाण्याला तातडीने आळा घालण्याच्या सूचना त्यांनी महापालिकेचे अभियंता आर. टी. पाटील यांना दिल्या.
महापौरपदी निवड झाल्यानंतर सोमवारी दिपमाला काळे थेट रस्त्यांवर उतरल्या. सकाळी त्यांनी नेरी नाका स्मशानभूमी येथील विकासकामांचे लोकार्पण केले. त्यानंतर गो-शाळेत जाऊन गाईंना चारा खाऊ घालून सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला. दुपारी चार वाजता त्यांनी मेहरुण तलाव परिसरात जाऊन सांडपाणी समस्येची पाहणी केली.
यावेळी अभियंता आर. टी. पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, अमृत २.० अंतर्गत मलनिस्सारण योजनेत मेहरुण तलाव परिसरातील भूमिगत गटारींचे काम समाविष्ट करण्यात आले आहे. त्यावर महापौर दिपमाला काळे यांनी, या योजनेची अंमलबजावणी करताना मेहरुण तलाव परिसराला प्रथम प्राधान्य देण्यात यावे, अशा स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या पाहणीदरम्यान नगरसेवक विशाल भोळे, महेश पाटील, अमित काळे, शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक इब्राहिम पटेल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.




















