
जळगाव मिरर | २८ फेब्रुवारी २०२६
शहरातील सागर पार्क परिसरातील सार्वजनिक शौचालयाचे सांडपाणी थेट मैदानावर सोडले जात असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक १२ मधील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांनाही अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे.
या संदर्भात स्थानिक रहिवाशांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याने नगरसेविका गायत्री इंद्रजित राणे यांनी तत्काळ दखल घेत संबंधित विभागाकडे कारवाईची मागणी केली. मैदानावर साचणाऱ्या सांडपाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
दरम्यान, सागर पार्क परिसरातील विविध समस्यांबाबत नगरसेविका राणे यांनी महापौर दीपमाला काळे यांना निवेदन सादर केले. महापौरांनी प्रकरण गांभीर्याने घेत संबंधित विभागाला तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेकडून शौचालयाच्या सांडपाण्याची योग्य निचरा व्यवस्था करून मैदान स्वच्छ व दुर्गंधीमुक्त करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. नागरिकांनी प्रशासनाने लवकरात लवकर ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.




















