
जळगाव मिरर | १० जून २०२५
गोवंशाची कत्तल करुन त्याचे मांस विक्रीसाठीच्या उद्देशाने घरात ठेवणाऱ्यांवर शनिपेठ पोलिसांनी छापा टाकला. याठिकाणाहून दीडशे किलो जनावरांचे मांस व कुऱ्हाड, धारदार सुरे जप्त केला. ही कारवाई सोमवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास ईस्माल पुरा भागात करण्यात आली. कारवाई करणाऱ्या पोलिसांना धक्काबुक्की केली असून याप्रकरणी शनिपेठ पोलिसात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील इस्लामपुरा भागात गोवंशाची कत्तल करुन त्याचे मांस विक्रीसाठी ठेवल्याची माहिती शनिपेठ पोलिस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळाली. त्यांनी लागलीच सहाय्यक पोलीस निरीक्षक साजीद मन्सूरी गुन्हे शोध पथकातील विक्की इंगळे, अनिल कांबळे, रविंद्र साबळे, अमोल वंजारी, कमलेश पाटील, गजानन वाघ, निलेश घुगे यांचे पथक तयार करुन कारवाईच्या सूचना दिल्या. दरम्यान, सोमवारी पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास हे पथक कारवाईसाठी ईस्लामपुरा भागात पोहचले. त्यांनी या परिसरात राहणाऱ्या नरगिस रऊफ खान, जमीलाबी अजिज शेख व मुस्तकीन शेख अजिज यांच्या घरात छापा टाकला. याठिकाणी पथकाला गो-मासांची बेकायदेशीररित्या कत्तल करुन ते विक्रीच्या उद्देशाने ठेवल्याचे मिळून आले.
पोलिसांनी छापा टाकल्यानंतर त्या घरांमधून ३० हजारांचे दीडशे किलो गो-वंश जनावरांची कत्तल करुन त्याचे मांस, जनावरांची कातडी व शिंगे, दोन कुऱ्हाड, तीन लोखंडी धारदार सुरे व लोखंडी रॉड असलेला मस्कुला व तराजू काटा जप्त करण्यात आला. कारवाई करतांना पथकाकडून घर झडती घेत होते, यावेळी नरगिस रऊफ खान, जमीलाबी अजिज शेख यांनी आरडाओरड करीत पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या अंगावर धावून जात त्यांना धक्काबुक्की केली. तसेच त्यांच्यावर हात उगारुन तुम्हाला काही काम नाही का, एवढ्या रात्री त्रास देता असे म्हणत शिवीगाळ केली.
कारवाई करतांना संशयित महिला आरोपींनी पोलिसांना धक्काबुक्की करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी संशयित नरगिस रऊफ खान (वय २०), जमीलाबी अजिज शेख (वय ७०) व मुस्तकीन शेख अजिज (तिघे रा. ईस्लामपुरा, जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सपोनि साजीद मन्सूरी हे करीत आहे.