जळगाव मिरर | १८ एप्रिल २०२५
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी चोरीच्या घटना सातत्याने घडत असतांना आता चोरीच्या गुन्ह्यात अटक झालेल्या जालन्याचा पोलिस उपनिरीक्षक प्रल्हाद पिराजी मांटे यांच्यासह चार जणांना चोपडा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या चौघाना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा बस स्थानकाच्या परिसरात चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना १६ रोजी मिळाली होती. त्यावरून चोपडा शहर पोलीस व जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद पिराजी मांटे (वय ५७, सदर बाजार, जालना), श्रीकांत भिमराव बघे (२७, रा. गोपाल नगर, खामगाव), अंबादास सुखदेव साळोकार (४३, रा. माना, ता. मूर्तिजापुर, जि. अकोला,) व रउफ अहमद शेख (४८, रा. महाळस, ता.जि. बीड) या चौघांना चोरीच्या गुन्हात अटक केली होती. यानंतर त्यांना आज चोपडा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या चौघांना २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे करत आहेत.
सिल्लोड, शिरपूर, चोपडा, एरंडोल याठिकाणी झालेल्या चोऱ्यांमध्ये ही पोलिस उपनिरीक्षक प्रल्हाद पिराजी मांटे यांच्या टोळीचा सक्रिय सहभाग असून अजून कुठल्या ठिकाणी या टोळीचा सहभाग आहे, याचा चोपडा पोलीस तपास करत आहेत. चोपडा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अंबादास सुखदेव साळोकार याच्यावर विविध ठिकाणी २७पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. यात जालना येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर अंबादास हा जालन्यातील सदर बाजार जेलमध्ये असताना प्रल्हाद मांटे यांच्याशी संपर्कात आला. तेथून अंबादास साळगावकर आणि प्रल्हाद मांटे हे वर्षभरापासून सोबत चोऱ्या करत असल्याची माहिती मिळाली आहे.