
जळगाव मिरर | २५ ऑक्टोबर २०२४
वरणगाव आयुध निर्माणीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वरणगाव फॅक्टरीत तयार होणाऱ्या गोळ्यांच्या (काडतूस) चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या एके-४७ या तीन व ५.५६ या दोन अशा या पाच रायफलींची शत्रागारांचे कुलूप तोडून चोरी झाल्याची धक्कादायक घटना २१ रोजी समोर आली. याप्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायफल चोरीची ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव आयुध निर्माणीत देशाच्या लष्करासाठी ५.५६ व एके ४७ रायफलच्या गोळ्या अर्थात काडतूस तयार केले जातात. या गोळ्या तयार झाल्यानंतर डेपोत पाठवण्याआधी त्यांची निर्माणी परिसरातच या रायफलद्वारे चाचणी घेतली जाते. या चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या ५ रायफलींची निर्माणीच्या शस्त्रागाराचे कुलूप तोडून चोरी झाल्याची घटना २१ ऑक्टोबर रोजी समोर आली होती. दरम्यान, शनिवारी या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी या शखागार विभागाला कुलूप लावून चावी मेन गेटवर जमा केली होती. त्यानंतर सोमवारी कर्तव्यावर हजर झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. तर या रायफल चोरीच्या घटनेबाबत फॅक्टरी प्रशासनासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पाच रायफली फॅक्टरी प्रशासनाच्या सुरक्षा यंत्रणेला भेदून चोरी झाल्याच कशा? असा प्रश्न यानिमित्त निर्माण झाला आहे. याप्रसंगी आयुध निर्माणीचे मुख्य महाप्रबंधक राकेश ओझा, कर्नल हेमंत चौधरी, अन्य अधिकारी आशीश जोशी, अश्विन नेमा, अक्षय वसू आदींनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, या रायफल शोधण्यासाठी आयुध निर्माणी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला. पण, या गहाळ झालेल्या पाच रायफली कुठेही आढळल्या नाहीत. अधिकाऱ्यांनी दोन दिवस गुप्तता पाळून २३ रोजी रात्री वरणगाव पोलिस ठाण्यामध्ये तेथील कनिष्ठ कार्यप्रबंधक प्रदीपकुमार बाबूराव चव्हाण यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध ८ लाख रुपये किमतीच्या ५ रायफलींची चोरी झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास स.पो.नि. जनार्दन खंडेराव करत आहेत.