जळगाव मिरर | २८ नोव्हेबर २०२४
येथील शहर विधानसभा मतदारसंघांमध्ये आ. राजूमामा आता सुरेश दामू भोळे यांचा विजय हा महायुतीच्या संघटनाचा आणि जनतेने भरभरून दिलेल्या आशीर्वादाचा असल्याचे दिसून आले आहे. पुढील काळात पाठपुरावा करून प्रलंबित कामे पूर्ण केले जातील, अशी माहिती आ. राजूमामा भोळे यांनी दिली आहे.
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रचारासाठी कुठल्याही बड्या नेत्याची सभा झाली नाही. तसेच कुठलीही मोठी रॅली काढण्यात आली नाही. कुठल्याही सेलिब्रेटीचा रोड शो आयोजित झाला नाही. तरीही आ.राजूमामा भोळे यांनी केवळ दहा वर्षात केलेल्या विकास कामांना समोर ठेवून जनतेकडे मते मागितली. मी ५० टक्के कामे पूर्ण केली असून २५ टक्के कामांचे भूमिपूजन झाले आहे. उर्वरित २५ टक्के कामे आगामी काळात मी पूर्ण करेल अशी भूमिका प्रामाणिकपणे आ. राजूमामा भोळे जनतेपुढे मांडत होते. आ. राजूमामांचा हाच स्वभाव जनतेला भावला.
आ. राजूमामा भोळे हे जनतेला त्यांच्या कार्यालयामध्ये सहज उपलब्ध होतात. जनतेची कामे ऐकण्यासाठी व ते पूर्ण करण्यासाठी आ. राजूमामा भोळे प्रत्यक्ष नागरिकांना माहिती देत असतात. संपूर्ण जळगाव शहरांमध्ये त्यांचा सातत्यपूर्ण संपर्क आहे. मतदारसंघात १० वर्षात त्यांनी प्रचंड कामे केली आहेत. शासनाच्या लाडकी बहीण योजनेसाठी त्यांनी स्वतः यंत्रणा राबवली. तसेच केंद्रीय व राज्याच्या विविध योजनांसाठी स्वतःच्या कार्यालयातील कर्मचारी उपलब्ध करून दिले आहेत. सर्वांच्या कामी येणारा व विधानसभेत शहराचे प्रश्न मांडणारा लोकप्रतिनिधी म्हणून आ. राजूमामा भोळे यांची ख्याती आहे.
आ.राजूमामा भोळे यांनी प्रचारामध्ये टीकाटिपणी तसेच आरोप करण्यापेक्षा सकारात्मक प्रचार कसा होईल यावर भर दिला. उड्डाणपूल, रस्त्यांचे कामे तसेच एमआयडीसी असे विविध मुद्दे जनतेला सांगून आशीर्वाद मागितले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भावनिक आवाहन केले. विधानसभेत परिवर्तन हा मुद्दा जळगाव शहरात दिसूनच आला नाही. जनतेच्या सुखदुःखात कायम सहभागी होणारे तसेच स्वच्छ प्रतिमेचे म्हणून आ. राजूमामा भोळे प्रसिद्ध आहे. त्यामुळेच आता माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यानंतर आ. सुरेश दामू भोळे अर्थात राजूमामा यांच्या विजयाची परंपरा तिसऱ्यांदा देखील कायम राहिली आहे. तब्बल ८७ हजार ५०९ मताधिक्याने आमदार भोळे विजयी झाले आहेत.