जळगाव मिरर / १२ मार्च २०२३ ।
पारोळा तालुक्यातील मोंढाळे येथे गेल्या पंधरा दिवसांपासून या शिवारात धुमाकूळ घालणारा बिबट्या वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास अडकला आणि परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
हिवरखेडा शिवारात लागोपाठ दोन दिवस वासरांचा फडशा पाडत असलेल्या बिबट्याच्या शोधात वन खात्याचे अधिकारी व कर्मचारी परिसरात ठाण मांडून होते. ट्रॅप कॅमेरा व रात्रीच्या गस्त सुरू होत्या. यातच गेल्या २७ फेब्रुवारीला मंगरूळ परिसरातील एका विहिरीत पडलेला बिबट्या आढळून आला. हा बिबट्याच हिवरखेडा परिसरातील असावा म्हणून सर्वांनी नि:श्वास सोडला. परंतु हिवरखेडा परिसरात ८ रोजी रात्री पुन्हा वासराचा फडशा पाडण्यात आला. वनखात्याचे अधिकारी विवेक होसिंग, उपवनसंरक्षक जळगाव व सहायक वनसंरक्षक एस. के. शिसव यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा वनक्षेत्रपाल शामकांत बी. देसले, वन्यजीव रक्षक विवेक देसाई, वनपाल अनिल बोरूदे, वनरक्षक सविता पाटील, वनरक्षक रोहिणी सूर्यवंशी, आय. बी. मोरे, एस. यु. खैरनार व संरक्षण मजूर यांच्या सहकार्याने या भागात पिंजरा लावण्यात आला. याच पिंजऱ्यात अखेर बिबट्या अडकला.