जळगाव मिरर | १३ ऑगस्ट २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मनसे व ठाकरे गटात गेल्या चार दिवसापासून आरोप प्रत्यारोप सुरु झाल्याने राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. तर नुकतेच मनसेने उद्धव ठाकरे गटाला डिवचले आहे. जर तुम्ही आमच्या घरावर येणार असाल तर आम्ही पण तुमच्या घरात घुसू, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उद्धव ठाकरे गटाला इशारा देण्यात आला आहे. आम्हाला टिचवू नका, परत कोणी मस्ती केली तर आम्ही गप्प बसणार नाही, हेही लक्षात ठेवा. ही विचारांची लढाई आहे, विचारांनीच लढली पाहिजे. राज ठाकरे यांनी आम्हाला शांत राहण्याचे आदेश दिले आहेत. म्हणून आम्ही शांत आहोत, असा खरमरीत इशारा मनसेच्या वतीने उद्धव ठाकरे गटाला देण्यात आला आहे. राज ठाकरेंवर प्रेम करणारे हजारो वेडे आहेत. तुम्ही सुरुवात करणार असाल तर शेवट आम्हाला करावा लागेल, अशा शब्दात मनसेचे ठाकरे गटाला डिचवले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरुद्ध उद्धव ठाकरे गट असा एकमेकांमध्ये वाद झाल्याचे दिसून येत आहे. राज ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्या दरम्यान उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या समोर निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. तसेच राज ठाकरे यांच्या गाडीसमोर सुपारी फेकत आंदोलन केले. याला प्रत्युत्तर म्हणून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर शेण फेकले. त्यामुळे आता हा वाद चांगलाच पेटला आहे. त्यातच आता राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर निघत आहेत. मात्र, राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याच्या आधीच मनसे नेते अविनाश जाधव यांनी उद्धव ठाकरे गटाला गर्भीत इशारा दिला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा मराठवाडा आणि विदर्भ दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. राज ठाकरे हे पुन्हा एकदा आपल्या आक्रमक शैलीत विरोधकांना प्रत्युत्तर देत आहेत. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. तुमच्याकडे प्रस्थापित असतील तर माझ्याकडे विस्थापित आहेत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे माझ्या नादी लागू नका, तसेच झाले तर माझी पोरं काय करतील हे सांगता येत नाही. माझे मोहोळ उठले तर तुमची एकही सभा महाराष्ट्रात होऊ देणार नाही. अशा शब्दात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना इशारा दिला होता. त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर शेण फेकत हल्ला चढवला होता. त्यामुळे आता हे प्रकरण चांगलेच तापले आहे.