जळगाव मिरर | १४ डिसेंबर २०२३
राज्यात गेल्या महिन्यापासून मनोज जरांगे पाटील राज्यभर दौरे करीत सभा घेवून सरकारकडे आरक्षण मागत आहे तर दुसरीकडे ओबीसीचे नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे देखील काही जिल्ह्यात सभा घेत जोरदार टीका करीत आहे. यावर गुरुवारी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मंत्री भुजबळ यांच्यावर एकेरी शब्दांत निशाणा साधला आहे. छगन भुजबळ एकदा तुरुंगात जावून आलेत. त्यांना पुन्हा त्यात जायचे नाही, त्यामुळे त्यामुळे ते माझ्या जिवाला धोका आहे, माझी छाती दुखत आहे, असे खोटेनाटे सांगून वेळ मारू नेत आहेत, असे ते म्हणालेत.
राज्यात जातीयवादाची भूमिका आम्ही नव्हे तर छगन भुजबळ यांनी भाषा सुरू केली. जातीय तेढ निर्माण केले. ते मंत्रिपदाची सन्मानच राखत नाही. त्यांना त्यांच्यावर सुरू असणाऱ्या खटल्यांतून मुक्ती हवी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा डावा समजून घ्यावा. हा तुम्हाला मागे टाकून पुढे जाईल. त्याच्याशी आमचे कोणतेही देणेघेणे नाही. पण या विश्वासघातकी माणसाचे ऐकून तुम्ही मराठा समाजावर अन्याय करू नका. कारण, सरकारविरोधात आता गावपातळीवर तीव्र रोष निर्माण होत आहे, असे जरांगे सरकारला इशारा देत म्हणाले.
मराठा समाजाच्या काही ठराविक नेत्यांना आरक्षण नको असेल, ते आमची बाजू प्रखरपणे मांडत नसतील, तर त्यांनी आरक्षण घेऊ नये. त्यांच्यावर मराठा बांधवांची बारीक नजर आहे. त्यांनी आरक्षण घेऊ नये. पण गरीब मराठ्यांना आरक्षण हवे आहे. त्यामुळे सरकारने या मोठ्या मराठ्यांचे न ऐकता गरीबांना आरक्षण द्यावे, असे मनोज जरांगे म्हणाले.